निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर, झोपल्या ग जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी, उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले, माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता, गाऊ कशी मी अंगाई