प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा
लपसि कोठे गोपाला, गोविंदा
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
प्रसन्न सुंदर वा कमळाचे
त्याची मज हो बाधा
तुला शोधिते मी दिनराती
तुजसि बोलते हरि एकांती
फिरते मानस तुझ्या सभोवति
छंद नसे हा साधा
तुझ्याविना रे मजसि गमेना
पळभर कोठे जीव रमेना
या जगतासि स्नेह जमेना
कोण जुळवि हा सांधा