घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला